भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ भाग – १

भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ भाग – १

अजैविक घटक : पर्यावरणातील निर्जीव घटक, उदा. हवा, पाणी, खनिजे इत्यादी.

अधिवास : वनस्पती किंवा प्राण्यांचे मूळ निवासस्थान. ज्या प्रदेशात नैसर्गिकरित्या वनस्पती व प्राणी राहतात व त्यांचा विकास होतो असा प्रदेश.

अक्षवृत्तः पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळाकार रेषा. या वर्तुळांची पातळी पृथ्वीच्या आंसास काटकोनात छेदते. या वर्तुळाकार रेषा एकमेकींना समांतर असतात.

अक्षांशः एखाद्या ठिकाणचे विषुववृत्तापासूनचे अंशात्मक अंतर, हे अंशात्मक अंतर पृथ्वीच्या केंद्रापाशी मोजले जाते. अक्षांश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस मोजले जातात.

अक्षीय गतीः पृथ्वीची स्वतःच्या आंसाभोवती फिरण्याची गती. पृथ्वी ज्या काळात स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्यास दिवस म्हणतात.

आयनांबरः पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ८० ते ५०० किमी उंचीच्या दरम्यानचा वातावरणाचा थर. या थरात रेडिओलहरी परावर्तित होतात, त्यामुळे या थराचा संदेशवहनात उपयोग होतो.

आर्द्रताः हवेतील बाष्पाचे प्रमाण. आर्द्रता शेकडा प्रमाणात सांगितली जाते.

आसः पृथ्वीचा उत्तर व दक्षिण ध्रुव साधणारी व पृथ्वीच्या मध्यातून जाणारी काल्पनिक रेषा. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे म्हणजे परिवलनामुळे आस तयार होतो.

उत्तर ध्रुवः पृथ्वीच्या आंसाचे ध्रुवताऱ्याकडील टोक.

कक्षाः सूर्यमालेतील ग्रह एका विशिष्ट मार्गावरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. या प्रदक्षिणेच्या मार्गास कक्षा असे म्हणतात, ग्रह जसे सूर्याभोवती फिरतात, तसेच उपग्रह त्या त्या ग्रहाभोवती फिरतात.

कक्षीय गतीः पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची म्हणजेच परिभ्रमणाची गती. पृथ्वी सूर्याभोवती ज्या काळात एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्यास वर्ष असे म्हणतात.

कुटीरोद्योगः अगदी लहान प्रमाणावर – घरगुती स्वरूपात कच्च्या मालावर प्रक्रीया करून पक्का माल तयार करणारे उद्योग, यातील पक्का माल बऱ्याच अंशी स्थानिक बाजारपेठेत विकला जातो.

खाजण सरोवरः सागरी किनाऱ्यावर वाळूचे दांड किंवा बेटे तयार होऊन सागरी जलाचा वेगळा झालेला साठा. यातील पाणी खारट असते.

खाडी: नदीच्या मुखाकडील प्रवाह, यात नदीचे गोडे पाणी व भरतीमुळे येणारे समुद्राचे खारे पाणी एकत्र येते.

खारफुटीः समुद्रकिनाऱ्यावरील खाडयांतील दलदलीमध्ये वाढणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पती. या वनस्पती खारे व गोडे पाणी ज्या भागात एकत्र येते तेथे वाढतात. यांची मुळे दलदलीतून वर आलेली दिसतात. या वनांमुळे सागरी किनाऱ्याचे मोठया लाटांपासून संरक्षण होत असते.

खोरेः नदीला ज्या प्रदेशातून पाण्याचा पुरवठा होतो तो प्रदेश. पाणलोट क्षेत्र…

गोदीः बंदराच्या ठिकाणी जहाजे नांगरण्यासाठी ( तरंगत्या अवस्थेत उभी करण्यासाठी ) असलेली जागा. या ठिकाणी सागरी जल आत घेता येते किंवा बाहेर सोडता येते. त्यामुळे पाण्याची आवश्यक पातळी राखली जाते.

जलावरणः पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जलीय आवरण. यात सर्व महासागर व समुद्रांचा समावेश होतो.

जीवावरण: जीवसृष्टीचे अस्तित्व असलेला पृथ्वीचा भाग, जीवसृष्टी पृथ्वीच्या इतर तिन्ही आवरणात आढळते.

जैवविविधताः एकाच प्रदेशात अनेक त-हेच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव एकत्ररित्या दिसून येतात. या सजीवांतील विविधतेलाच जैवविविधता असे म्हणतात. भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळया प्रदेशांत विविधता कमी किंवा जास्त असते. उष्ण हवामान व भरपूर पाऊस असणाऱ्या प्रदेशांत जैवविविधता जास्त असते.

जैविक घटकः पर्यावरणातील सजीव घटक. यांत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो.

ढगः वातावरणात तरंगत्या अवस्थेत असलेला अतिसूक्ष्म जलकण किंवा हिमकण यांचा समुदाय.

तपांबर: पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा वातावरणाचा थर. यात उंचीप्रमाणे तापमान कमी होते. या थराची सरासरी जाडी १३ किमी असते.

तापमानः एखाद्या वस्तूच्या किंवा ठिकाणाच्या उष्णतेचे प्रमाण.

तापस्तब्धीः तपांबराचा वरचा भाग. यात तापमान उंचीनुसार बदलत नाही. स्तब्ध राहते, म्हणून यास तापस्तब्धी म्हणतात.

त्रिभुज प्रदेशः नदीच्या मुखाकडील गाळाच्या संचयनामुळे तयार होणारा त्रिकोणी आकाराचा सखल मैदानी प्रदेश.

दक्षिण ध्रुवः पृथ्वीच्या आसाचे उत्तर ध्रुवाच्या विरूध्द बाजूचे टोक.

दिनः सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ.

दिवसः दिन व रात्र मिळून एक दिवस होतो. पृथ्वीचा स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा काळ. एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ.

1 COMMENT

Comments are closed.