JANANI SURAKSHA YOJNA JSY जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजना ( JSY )

जननी सुरक्षा योजनेची सुरूवात 12 एप्रिल 2005 या दिवशी झाली. केंद्र शासनातील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते. महाराष्ट्रामध्ये 22 डिसेंबर 2006 च्या शासन निर्णयानुसार जननी सुरक्षा योजना राबवली जाते. भारत सरकारने जननी सुरक्षा योजनेतील लाभार्थ्याचे वय व आपत्यासंबंधीच्या अटी 8 मे 2013 पासून शिथिल केल्या आहेत.

जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी : ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गर्भवती महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. ग्रामीण व शहरी भागातील आशा कार्यकर्ती यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजने मार्फत आर्थिक मदत केली जाते.

जननी सुरक्षा योजनेची उद्दिष्टे : या योजनेचे दोन उद्दिष्टे आहेत.
1) महिलांचे आरोग्य संस्थेमध्ये म्हणजेच दवाखान्यात प्रसुतीचे प्रमाण वाढवणे.
2) ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मातामृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे.

जननी सुरक्षा योजने मार्फत लाभार्थ्यास पुढील लाभ दिले जातात :
1) या योजनेतील ग्रामीण भागातील लाभार्थीची जर शासकीय आरोग्य संस्थेत म्हणजेच शासकीय दवाखान्यात किंवा या योजने अंतर्गत मानांकित खाजगी दवाखान्यात प्रसूती झाली तर त्या लाभार्थीला प्रसूतीच्या तारखेनंतर सात दिवसांच्या आत 700 रुपये लाभ दिला जातो. हे सातशे रुपये लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे ( Account Payee Crossed Cheque ) दिले जातात.
2) या योजनेतील शहरी भागातील लाभार्थीची जर शासकीय आरोग्य संस्थेत म्हणजेच शासकीय दवाखान्यात किंवा या योजने अंतर्गत मानांकित खाजगी दवाखान्यात प्रसूती झाली तर त्या लाभार्थीला प्रसूतीच्या तारखेनंतर सात दिवसांच्या आत 600 रुपये लाभ दिला जातो. हे सातशे रुपये लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे दिले जातात.
3) या योजनेतील ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थीची प्रसूती जरी घरी झाली असेल तरीही आशा लाभार्थीस प्रसुतीनंतर सात दिवसांच्या आत 500 रुपयांचा लाभ दिला जातो.  हे 500 रुपये लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे दिले जातात.
4) या योजनेतील लाभार्थीची सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास, त्या लाभार्थीस 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते. हे 1500 रुपये लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे दिले जातात.

जनानी सुरक्षा योजने मार्फत आशा कार्यकर्तीस पुढील प्रमाणे आर्थिक लाभ दिला जातो :
1) या योजनेतील ग्रामीण भागातील लाभार्थीस शासकीय आरोग्य संस्थेत किंवा खाजगी मानांकित आरोग्य संस्थेत प्रसूती करण्यासाठी प्रवृत्त केल्यास 600 रुपये प्रति लाभार्थी इतकी आर्थिक मदत आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून दिली जाते. या योजनेतील लाभार्थीस प्रसूतिपूर्व देण्यात येणाऱ्या सेवा दिल्याची खात्री झाल्यावर 300 रुपये आणि आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यावर 300 रुपये आशा कार्यकर्तीस दिले जातात.
2) या योजनेतील शहरी भागातील लाभार्थीस शासकीय आरोग्य संस्थेत किंवा खाजगी मानांकित आरोग्य संस्थेत प्रसूती करण्यासाठी प्रवृत्त केल्यास 400 रुपये प्रति लाभार्थी इतकी आर्थिक मदत आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून दिली जाते. या योजनेतील लाभार्थीस प्रसूतिपूर्व देण्यात येणाऱ्या सेवा दिल्याची खात्री झाल्यावर 200 रुपये आणि आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यावर 200 रुपये आशा कार्यकर्तीस दिले जातात.

जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पुढील आरोग्य संस्था सेवा देतात :
ग्रामीण भागातील आरोग्य संस्था : प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व या योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्णालये.
शहरी भागातील आरोग्य संस्था : महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्र, नागरी कुटुंब कल्याण केंद्र, शासकीय अनुदानित रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय व या योजनेअंतर्गत मानांकित केलेली खाजगी रुग्णालये.

या योजने अंतर्गत आशा कार्यकर्तीस पुढील कामे करावी लागतात :
1) या योजनेतील लाभार्थी कडून या योजनेकरिता आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे प्राप्त करून घेणे.
2) जननी सुरक्षा योजनेचे विहित नमुन्यातील कार्ड सर्व आवश्यक माहिती भरून लाभार्थीस देणे.
3) या योजनेतील लाभार्थीस बँकेमध्ये खाते उघडून देण्यासाठी मदत करणे.
4) या योजनेतील लाभार्थीस प्रसूतिपूर्व तीन तपासणी, लोहयुक्त गोळ्या आणि धनुर्वात प्रतिबंधक लस मिळवून देणे.
5) या योजनेतील लाभार्थीस शासकिय आरोग्य संस्थेमध्ये किंवा शासनामार्फत मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत प्रसूती करिता प्रवृत्त करणे.