मराठी भाषेचा विकास व मराठी भाषेची माहिती

मराठी भाषेचा विकास व मराठी भाषेची माहिती

               इ.स. ५ व्या शतकात प्राकृत व्याकरणकार वररूचि यांनी आपल्या ‘प्राकृतप्रकाश’ ग्रंथात महाराष्ट्री ही प्रमुख प्राकृत भाषा मानून तिचे वर्णन केले आहे. जगातील संपन्न व समृद्ध भाषापैकी मराठी ही एक आहे. ती गद्यात्मक व पद्यात्मक आहे. मराठी ही संताच्या वाणीतून, पंडितांच्या लेखणीतून व शाहिरांच्या रचनेतून वैभवसंपन्न बनलेली आहे.

मराठीतील प्राचीन साहित्य बरेचसे संतांनी, पंडितांनी व शाहिरांनी लिहिलेले आजही अस्तित्वात आहे. भारतातील २२ भाषापैकी मराठी ही एक भाषा आहे. पाणिनीच्या व्याकरणावर महाभाष्य लिहिणाऱ्या पतंजलीने व्याकरणाला ‘शब्दानुशासन’ असेच प्रारंभी म्हटले आहे.

मराठी भाषा मुख्यत: बाळबोध लिपीत अथवा क्वचित मोडी लिपीत लिहिली जाते. पण बाळबोध हे काही या लिपींचे खरे नाव नाही ही लिपी देवनागरी आहे. आपल्या भारतात उर्दू, रोमन, कैथी, मुडिया, मैथिली इ. लिप्या आहेत. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. आज बऱ्याच देशात आपली भाषा स्थलांतरामुळे बोलली जातेय. भारतात मराठी भाषेचे स्थान चौथ्या क्रमांकावर आहे.

२०१२ साली महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी अभिजात (अभिजात – सुसंस्कृत) भाषा संशोधन समिती नेमली आहे. आतापर्यंत भारतातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. (तेलगू, तमिळ, मल्याळम, कानडी, उडिया, संस्कृत).

भारताची राष्ट्रीय लिपी म्हणून देवनागरी लिपी मान्यतेस पावलेली आहे. भारतात इ.स. पूर्व ६ व्या शतकात ब्राह्मी व खरोष्ठी लिपी प्रचारात होत्या. खरोष्ठी लिपी उर्दु प्रमाणे लिहिली जाते (उजवीकडून डावीकडे) व ब्राह्मी लिपी ही भारतीय लिपीचा उगम मानली जाते. ब्राम्हीचे दोन भाग पाडले गेले उत्तर ब्राह्मी व दक्षिण ब्राह्मी. ब्राह्मी लिपीस गुप्त काळात गुप्तलिपी असेही संबोधले जात.

दक्षिण भारतात कानडी, तेलगू, वगैरे भाषा वेगवेगळ्या लिपीतून लिहिल्या जातात. यासर्व लिप्यांतून देवनागरी लिपीचे महत्व विशेष आहे. या लिपीस प्राचीन इतिहास असून आपले सर्व सांस्कृतिक वाङमय याच लिपीतून प्रकट झाले आहे. देवनागरी लिपीत संस्कृत प्रमाणे पुढील भाषा लिहिल्या जातात – बंगाली, हिंदी, मराठी, गुजराथी.

मराठी साहित्याच्या उत्पत्तीविषयी माहिती

               मराठी साहित्यातील आद्यकवी  मुकुंदराज आहेत. मुकुंदराज यांनी लिहिलेला ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ मराठीतील आद्य ग्रंथ होय. या ग्रंथात  १६९८ ओव्या आहेत व हा ग्रंथ बराचसा संस्कृत भाषेत दिसून येतो. हा ग्रंथ उपमा व दृष्टांत या अलंकारात रचनाबद्ध केलेला आहे. मुकुंराजांनी परमामृत व पवनविजय हे ग्रंथही लिहिले. मुकुंदराजांना मराठी वाङ्मयातील पहाटेचा ‘शुक्रतारा’ असे संबोधतात. मुकुंदराजानंतर ज्ञानेश्वर व म्हाइंभट यांच्या ग्रंथाचा पुरावा मराठीत दिसून येतो.