मराठी भाषेची उत्पत्ती व मराठी भाषेची थोडक्यात माहिती
मराठी भाषा ही समृद्ध व श्रीमंत भाषा आहे. संस्कृत भाषा ही मराठीची जननी आहे. भाषा अचानक निर्माण होत नसते तर भाषेला पूर्वेतिहास असतो. मराठी भाषेच्या उत्पत्तीचे टप्पे : संस्कृत – प्राकृत – अपभ्रंश – मराठी असा मराठीचा उत्पत्तीक्रम काळानुसार दिसून येतो. कोणत्याही भाषेमध्ये एखादा ग्रंथ किंवा लिखित पुरावा जेव्हा सापडतो तेव्हा ती भाषा त्या पुराव्याच्या सातशे ते एक हजार वर्ष अगोदर तयार झाली असावी किंवा अस्तित्वात आली असावी असा अंदाज बांधला जातो.
मानवी जीवनात भाषा ही सुरुवातीला लेखनासाठी अस्तित्वात आली नसून ती व्यवहारोपयोगी म्हणून जन्माला आली. व्यवहारोपयोगी भाषा ही प्रमाणबध्द मानली जाते. कारण व्यवहारातील ठरावीक घटनांना ठरावीक नावे दिली गेली असतात. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन, अशी भाषेची व्याख्या केली गेली आहे.
मराठीतील प्राचीन पुरावे पाहता शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्र वेगवेगळ्या ठिकाणी ग्रंथात्मक केलेले लिखाण हा भाषेचा ऐतिहासिक वारसा आपण शोधत जातो. मराठी भाषेला एक ते दीड हजार पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास लाभलेला पहावयास मिळतो.
मराठी ही इंडो-युरोपियन कुलातील भाषा आहे. ‘इंडो-युरोपियन भाषाकुल म्हणजे आद्य संस्कृत भाषा ज्याच्या पितृस्थानी आहे अशा भाषांचा गट होय.
मराठी भाषेत सापडलेला पहिला शिलालेख : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली कोरलेला शिलालेख. श्री चामुण्डराजे करवियले । गंगाराजे सुत्ताले करविले ॥ (श्री चामुण्डराजाने हा लेख कोरला, आणि श्री गंगाराजाने भोवतीचा तट उभारला) हा मराठी भाषेत सापडलेला पहिला शिलालेख आहे. हा मराठी भाषेतील पहिला ज्ञात लिखित पुरावा आहे. या शिलालेखाचा कालावधी शके १०३८ – ३९ म्हणजेच इ.स. १११६ – १७ आहे.
अक्षी (कुलाबा) सध्याचे रायगड येथील शिलालेख शके ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ सालचा आहे. आतापर्यंत सापडलेल्या सर्व शिलालेखात हा सर्वात जुना शिलालेख आहे.
गी सुष संतु । स्वस्ति ओं। पसीमसमुद्रधीपती। श्री कोंकणा चक्रीवर्ती । स्त्री केसीदेवराय । महाप्रधान भईर्जु सेणुई तसीमीनी काले प्रनतमने । सकु संवतु : ९३४ प्रधावी संवसरे: अधिक दिवे सुक्रे बौलु । भईर्जुवे तथा बोडणा तथा नौ कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु ।।
जगी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भुईर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वयपक्षात देवीच्या बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे