भौतिक राशींचे मापन व एकके ( Physical Quantities and Units )
राशी ( quantity ) : ज्याचे मोजमाप करायचे असते त्याला राशी असे म्हणतात.
राशी : फक्त अंकांच्या साह्याने दर्शवल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंवा पदार्थांच्या मापाला राशी असे म्हणतात.
राशींची उदाहरणे : वय, वजन, वस्तूंची संख्या
मूलभूत राशी : ज्या भौतिक राशींच्या मापनासाठी इतर कोणत्याही भौतिक राशींची आवश्यकता नसते, त्यांनाच मूलभूत राशी असे म्हणतात.
सुरुवातीला तीन मूलभूत राशी होत्या – वस्तुमान, लांबी ( अंतर ), वेळ.
सध्या एकूण सात मूलभूत राशी आहेत – वस्तुमान, लांबी ( अंतर ), वेळ, तापमान, प्रकाशाची तीव्रता, विद्युत धारा, पदार्थाचे प्रमाण ( रेणुभार ).
भौतिक राशी ( Physical Quantity ) : भौतिक नियमांच्या साह्याने ज्या राशी व्यक्त केल्या जातात त्यांनाच भौतिक राशी असे म्हणतात.
भौतिक राशी : एखादी वस्तू, पदार्थ किंवा संस्था यांचा असा गुणधर्म की ज्यांचे प्रमाण मापनाद्वारे ठरवता येते त्यालाच भौतिक राशी असे म्हणतात.
भौतिक राशींची उदाहरणे : तापमान, घनता, आकारमान, वस्तुमान, विस्थापन, वजन, बल, लांबी, रुंदी, कार्य, अंतर, वेग.
भौतिक राशींचे प्रकार : भौतिक राशींचे दोन प्रकार आहेत – 1) सदिश राशी 2) अदिश राशी
सदिश राशी ( Vector Quantities ) : ज्या राशीचे आकलन होण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोन्हींची गरज असते त्या राशीला सदिश राशी असे म्हणतात.
सदिश राशींची उदाहरणे : वजन, विस्थापन, बल, वेग, त्वरण, संवेग.
अदिश राशी ( Scalar Quantities ) : केवळ परिमाणाने स्पष्ट होणाऱ्या राशींना अदिश राशी असे म्हणतात.
अदिश राशींची उदाहरणे : वस्तुमान, आकारमान, तापमान, चाल, घनता, लांबी, रुंदी, अंतर, कार्य, काल, प्रभार, विद्युत धारा, ऊर्जा, क्षेत्रफळ.
मापन : मोजमाप करणे याला मापन असे म्हणतात.
मापन : एखादी राशी एककाच्या साह्याने मोजली जाते, त्या क्रियेला मापन असे म्हणतात.
परिमाणे : राशींच्या मापनासाठी एकसारखीच मापे वापरली जातात. त्या सर्वमान्य मापांना परिमाणे असे म्हणतात.
मापनाचे एकक ( Unit of Measurement ) : कोणत्याही राशीचे मापन करण्यासाठी त्या राशीचे एक निश्चित आणि ठोस प्रमाण म्हणजे एक मानक किंवा आदर्श मानले जाते त्यालाच त्या राशीचे एकक असे म्हणतात.
उदा. मीटर हे लांबी मोजण्याचे एकक आहे.
एककांचे प्रकार : एककांचे दोन प्रकार आहेत :
1) मूलभूत एकके 2) साधित एकके
मूलभूत एकक ( Fundamental Unit ) : ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते, त्याला मूलभूत एकक असे म्हणतात.
सध्या मूलभूत एकके एकूण सात आहेत. सुरूवातीला तीन मूलभूत एकके होती.
मूलभूत राशी मूलभूत एकक चिन्ह
लांबी मीटर m
वस्तुमान किलोग्रॅम kg
वेळ सेकंद s
तापमान केल्विन K
विद्युत धारा ॲम्पिअर A
प्रकाशाची तीव्रता कॅंडेला cd
पदार्थाचे प्रमाण मोल mol
साधित एकक ( Derived Unit ) : जे एकक दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूलभूत एककांपासून तयार होते त्यालाच साधित एकक असे म्हणतात.
उदा. मीटर/सेकंद, न्यूटन/मी²
एककांच्या पध्दती ( System of Units ) : एककांच्या एकूण चार पध्दती आहेत – 1) CGS 2) MKS 3) FPS 4) SI
सीजीएस ( CGS ) पध्दती : कार्ल गॉस यांनी इ. स. 1832 साली सीजीएस या पद्धतीची संकल्पना सर्वप्रथम मांडली. सीजीएस पद्धतीलाच फ्रेंच किंवा मेट्रिक एकक पद्धत असेही म्हणतात. CGS – Centimetre, Gram, Second.
लांबी – सेमी, वस्तुमान – ग्रॅम, वेळ – सेकंद
एमकेएस ( MKS ) पद्धती : जीऑर्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम इ. स. 1901 आली एमकेस पद्धत ही संकल्पना मांडली. इ. स. 1940 सालापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर या पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात झाली. MKS – Meter, Kilogram, Second.
लांबी – मीटर, वस्तुमान – किलो ग्रॅम, वेळ – सेकंद
SI पद्धती ( International System of Unit ) : SI पद्धती MKS पद्धतीचे विस्तारीत स्वरूप आहे. इ.स. 1971 साली जिनिव्हा या ठिकाणी झालेल्या वजन आणि मापन विषयी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये SI पद्धतीला मान्यता देण्यात आली.
एफपीएस ( FPS ) पद्धती : या पद्धतीलाच ब्रिटिश एकक पद्धती असे म्हणतात. या पद्धतीचा शोध विल्यम स्ट्रॉड यांनी लावला. FPS – Foot, Pound, Second.
लांबी – फूट, वस्तुमान – पौंड, वेळ – सेकंद